नांदेड शहर आणि परिसरात आज सकाळी ९ वाजून ४३ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. प्रशासनाच्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. अचानक जाणवलेल्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
भूकंपाच्या धक्क्यांदरम्यान काही ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरेही हादरल्याचे दिसून येत असून, या घटनेचे फुटेज समोर आले आहे. धक्क्यांची तीव्रता जाणवण्याइतकी असल्याने नागरिकांनी खबरदारी घेतली.
भूकंपानंतर प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात असून, या घटनेमुळे कोणतेही मोठे नुकसान किंवा जीवितहानी झाली आहे का, याबाबतची माहिती प्रशासनाकडून तपासली जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


