नवी मुंबईतील तुर्भे परिसरात वाढदिवस साजरा करताना तलवारीने केक कापणं एका तरुणाला चांगलंच भोवलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तुर्भे पोलिसांनी कारवाई करत संबंधित तरुणाला ताब्यात घेतलं.

मित्रांसोबत वाढदिवस साजरा करताना या तरुणाने तलवारीने केक कापला. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडिओच्या माध्यमातून दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे.

या प्रकरणी तुर्भे पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी किंवा दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने शस्त्रांचं प्रदर्शन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करून शस्त्रांचं प्रदर्शन करणाऱ्यांवर पोलिसांची नजर असून, अशा घटनांमध्ये संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जात असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

या घटनेमुळे तुर्भे परिसरात वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे.