सिंधुदुर्ग : पोलीस स्मृती दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या हुतात्मा पोलीस जवानांना विनम्र अभिवादन करण्यात आले. जिल्हा पोलीस मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमाला मंत्री नितेश राणे उपस्थित होते. यावेळी शहीद जवानांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
२१ ऑक्टोबर हा दिवस देशभरात पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो. या निमित्ताने सिंधुदुर्गात शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून हुतात्मा जवानांना मानवंदना देण्यात आली. देशाची सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या शौर्याचे यावेळी स्मरण करण्यात आले.
मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्यात शौर्य गाजवणारे हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर आणि तुकाराम ओंबळे यांच्यासह मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या बलिदानाचेही स्मरण करण्यात आले. देशाच्या सुरक्षेसाठी प्राण अर्पण करणाऱ्या या वीरांचे योगदान कायम प्रेरणादायी राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
मंत्री नितेश राणे यांनी हुतात्मा जवानांना अभिवादन करत त्यांच्या शौर्याला सलाम केला. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमातून देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.


