इंदापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली. दुष्काळामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ अडचणीत असल्याचे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीवर प्रश्न उपस्थित केले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी एक लाख रुपयांची मदत देण्याची मागणी त्यांनी केली.
इंदापूर तालुक्यातील लाकडी गावात रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरू करावीत, तसेच २३ विहिरींच्या परवानग्या प्रलंबित असल्याचा मुद्दाही सुळे यांनी उपस्थित केला. प्रशासनाने दुष्काळ निवारणासाठी वेगाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
उजनी परिसरातील प्रस्तावित एआय डेटा सेंटर आणि कर्जत येथील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर बोलताना विकासकामांना विरोध नसल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले. मात्र, विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखणे आणि स्थानिक नागरिकांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली. याशिवाय, साखर कारखान्यांच्या इथेनॉल निर्मिती धोरणावर प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांच्या अडचणींकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.


