पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे मोबाईलवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून १६ वर्षीय मुलावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ‘किंग इज बॅक’ असे स्टेटस ठेवल्याने हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
ही घटना काल रात्री शिवाजी चौक परिसरातील एका कपड्याच्या दुकानात घडली. संबंधित मुलगा या दुकानात काम करत होता. त्यावेळी तीन जण दुकानात घुसले आणि त्यांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात मुलगा जखमी झाला असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वी एमआयडीसी हद्दीत झालेल्या हत्या प्रकरणातील एक अल्पवयीन आरोपी सुधारगृहातून बाहेर आला होता. त्याच्यासोबत फोटो काढून संबंधित मुलाने ‘किंग इज बॅक’ असे स्टेटस ठेवल्याचे सांगितले जात आहे. याच रागातून तीन महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या तरुणाच्या मित्रांनी हा हल्ला केल्याचा प्राथमिक दावा आहे. या दाव्याची पुष्टी तपासातून होणे बाकी आहे.
हल्ल्यानंतर काही तासांतच पोलिसांनी संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. तसेच, हल्लेखोर ज्या वाहनातून पळून गेले, त्या वाहनाच्या चालकाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.


