यवतमाळ : नऊ दिवसांच्या भक्ती आणि उत्साहानंतर यवतमाळमध्ये लाडक्या आई अंबेच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. देवीला भावपूर्ण निरोप देण्यासाठी शहरातील प्रमुख मार्गांवर भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. ‘आई अंबे, पुढच्या वर्षी लवकर ये’ या जयघोषात विसर्जन मिरवणुका उत्साहात सुरू आहेत.

यंदा यवतमाळ जिल्ह्यात तीन हजार ४५७ सार्वजनिक दुर्गादेवी मंडळांनी, तर सात हजार ५०० घरगुती देवींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत विविध मंडळांनी आकर्षक देखावे आणि रोषणाईच्या माध्यमातून उत्सवात रंगत आणली. भक्तिमय वातावरणात साजऱ्या झालेल्या नवरात्रोत्सवाची सांगता आता देवीच्या विसर्जन मिरवणुकांनी होत आहे.

विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सुरक्षेची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे दोन हजार २०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. गर्दीचे व्यवस्थापन आणि मिरवणुकांवर देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, झूम कॅमेरे आणि ड्रोनचा वापर केला जात आहे.

नऊ दिवस मनोभावे पूजा-अर्चा केल्यानंतर लाडक्या देवीला निरोप देताना भाविकांमध्ये भक्ती आणि भावुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. जयघोष, उत्साह आणि धार्मिक वातावरणात यवतमाळमधील विसर्जन मिरवणुका लक्ष वेधून घेत आहेत.