नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. शहरातील वाढत्या अपघातांच्या घटनांनंतर रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
राजगड येथे झालेल्या या बैठकीत शहरातील विविध भागांतील रस्त्यांची सद्यस्थिती, नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी आणि खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या समस्यांचा आढावा घेण्यात आला. पदाधिकाऱ्यांनीही स्थानिक परिस्थितीबाबतची माहिती बैठकीत मांडली.
यावेळी खड्ड्यांच्या प्रश्नावर मनसेची पुढील भूमिका काय असणार, प्रशासनाविरोधात कोणती भूमिका घ्यायची आणि आगामी आंदोलनाची दिशा कशी असावी, यावर सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
राज ठाकरे यांच्या दोन दिवसीय नाशिक दौऱ्यात रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा केंद्रस्थानी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बैठकीनंतर मनसे कोणती भूमिका जाहीर करते आणि प्रशासन यावर काय प्रतिक्रिया देते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


