भाजीपाल्यानंतर आता किराणा मालाच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसू लागली आहे. गेल्या महिनाभरात अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या दरात १० ते १५ टक्क्यांची वाढ झाल्याने घरगुती बजेट विस्कळीत झाले आहे.

साखर, डाळी, तांदूळ, खाद्यतेल, गहू, पोहे तसेच सुकामेवा यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मासिक किराणा खर्चात मोठी वाढ झाल्याची भावना ग्राहक व्यक्त करत आहेत.

किराणा व्यापाऱ्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल, वाहतूक खर्च, पॅकेजिंग खर्च आणि पुरवठा साखळीवरील वाढता खर्च यामुळे किराणा मालाच्या किमती वाढल्या आहेत. श्रावण महिना आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढण्याची शक्यता असल्याने दर आणखी वाढू शकतात, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

सणासुदीच्या तोंडावर वाढलेल्या महागाईचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य कुटुंबांना बसत आहे. घरगुती खर्चाचे नियोजन करताना नागरिकांना आता किराणा खरेदीसाठी अधिक पैसे खर्च करावे लागत आहेत.

दरवाढीचा परिणाम केवळ दैनंदिन खर्चावरच नाही, तर सणासुदीच्या खरेदीवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, ग्राहकांकडून वाढत्या महागाईबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.