नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ‘हर घर भगवा’ मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेमुळे सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी नाशिक शहर भगवामय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नाशिकच्या रामकुंड परिसरात सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी भगवे ध्वज आणि भगव्या पताका लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसराला विशेष भगवे स्वरूप प्राप्त झाले आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांना आपल्या घरांवर भगवे ध्वज लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्तेही या उपक्रमात सहभागी होत आहेत.
विशेष म्हणजे, या मोहिमेसाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून नाशिक शहरासाठी ७५ हजार, तर त्र्यंबकेश्वरसाठी २५ हजार भगवे ध्वज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांमध्ये भगवे ध्वज लावण्यात येत आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ऐतिहासिक पर्वाचे स्वागत करण्यासाठी नाशिकमध्ये धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ‘हर घर भगवा’ मोहिमेमुळे शहराच्या सजावटीत आणखी भर पडली आहे.


