नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये गोदाआरतीचा दुसरा विश्वविक्रम करण्याची तयारी करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी चार वाजता गोदावरी नदीच्या तीरावर सुमारे ६ हजार ६५७ आदिवासी बांधवांच्या सहभागातून भव्य गोदाआरती आयोजित करण्यात येणार आहे. यापूर्वी अयोध्येत ४ हजार ९११ नागरिकांच्या सहभागातून झालेल्या आरतीचा विक्रम मोडण्याचे उद्दिष्ट या माध्यमातून ठेवण्यात आले आहे.

 

या विश्वविक्रमी सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह १३ आखाड्यांचे प्रमुख महंत, शंकराचार्य आणि चार जगद्गुरू उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व मान्यवर एकाच व्यासपीठावर उपस्थित राहण्याची ही पहिलीच घटना ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

या गोदाआरतीमध्ये ६० टक्के पुरुष आणि ४० टक्के आदिवासी महिला सहभागी होणार आहेत. सुमारे सात ते नऊ मिनिटांची ही आरती असणार असून, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये या विक्रमाची नोंद व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

 

या विश्वविक्रमी गोदाआरतीचे प्रमाणपत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सोहळ्यामुळे नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वात आणखी एक ऐतिहासिक क्षण जोडला जाणार आहे.