नाशिकमध्ये सिंहस्थ महाकुंभ २०२७च्या पार्श्वभूमीवर ‘भक्तिसंगम महोत्सवा’ची उत्साहात सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याला विविध राजकीय पक्षांतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

कार्यक्रमाला भाजपचे गिरीश महाजन, जयकुमार रावळ, राहुल ढिकले, देवयानी फरांदे आणि सीमा हिरे, शिंदे गटाचे उदय सामंत, राष्ट्रवादीच्या आमदार सरोज आहिरे, तसेच उद्धव सेनेचे खासदार राजाभाऊ वाजे आणि काँग्रेसच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांची उपस्थिती होती. त्यामुळे भक्तिसंगमच्या मंचावर सर्वपक्षीय राजकीय उपस्थिती पाहायला मिळाली.

मात्र, जिल्ह्यातील प्रमुख नेते छगन भुजबळ आणि नरहरी जिरवाळ या सोहळ्याला अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः पालकमंत्रीपद न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर त्यांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

एकीकडे सिंहस्थ महाकुंभाच्या तयारीला वेग येत असताना दुसरीकडे सत्ताधारी पक्षांमधील नेत्यांच्या उपस्थिती-अनुपस्थितीवरून राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या अनुपस्थितीमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

कुंभमेळ्याच्या तोंडावर नाशिकच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे? भक्तिसंगमच्या मंचावर कोणते नेते उपस्थित होते आणि भुजबळ-जिरवाळ यांच्या अनुपस्थितीची चर्चा का रंगली? पाहा संपूर्ण बातमी.

📰 आपलं नाशिक | आपला आवाज