नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात अनुदानित युरिया खताच्या कथित काळाबाजारावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने आणि लासलगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. विंचूरजवळील पाबळवाडी येथील एका कांदा गोदामावर टाकलेल्या छाप्यात सुमारे ८४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान अनुदानित युरिया खताच्या गोण्या व्यावसायिक पॅकिंगमध्ये भरून कथितपणे काळाबाजारासाठी तयार केल्या जात असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
कारवाईत ७६१ युरिया खताच्या गोण्या, एक ट्रक आणि एक आयशर टेम्पो असा एकूण सुमारे ८४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.


