सम्राट वृंदावनजवळील फ्लायओव्हरवर धोकादायक स्थिती निर्माण झाल्याचे समोर आले आहे. फ्लायओव्हरवरील स्टीलच्या सळ्या उघड्या पडल्या असून, काही ठिकाणी लोखंडी सळ्या कमकुवत झाल्याचे दिसत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सम्राट वृंदावनजवळील फ्लायओव्हरचा एक व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये फ्लायओव्हरवरील काही भागातील स्टील बार उघडे पडल्याचे दिसत आहे. काही सळ्या तुटण्याच्या किंवा कमकुवत होण्याच्या स्थितीत असल्याचेही दिसून येत आहे.
फ्लायओव्हरवरून दररोज मोठ्या संख्येने वाहने ये-जा करतात. त्यामुळे या भागातील स्ट्रक्चर कमकुवत असल्यास भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
फ्लायओव्हरच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. सळ्या तुटल्या किंवा स्ट्रक्चरचा काही भाग कोसळला, तर त्याचा थेट परिणाम खाली आणि फ्लायओव्हरवरून जाणाऱ्या वाहनांवर होऊ शकतो.
त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी या ठिकाणी तातडीने पाहणी करण्याची गरज आहे.
ओझर फ्लायओव्हरवरील घटनेनंतर अशा प्रकारच्या धोकादायक स्थितीकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची मागणी होत आहे. NHAI आणि संबंधित ठेकेदाराने फ्लायओव्हरची तातडीने स्ट्रक्चरल तपासणी करावी, तसेच धोकादायक भागाची आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, फ्लायओव्हरची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाकडून कोणती कार्यवाही केली जाते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.


