नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाढलेल्या अपघातांच्या आणि चार नागरिकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आता नागरिकांनी थेट महापालिकेविरोधात आंदोलन पुकारले आहे. 'आम्ही नाशिककर' या टॅगलाईनखाली येत्या ७ ऑगस्ट रोजी नाशिक महापालिकेला घेराव घालण्यात येणार असून, या आंदोलनामुळे शहरात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

आंदोलनाची सुरुवात सकाळी ९ वाजता मुंबई नाका येथून होणार आहे. खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांच्या हस्ते महापौर आणि महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतर आंदोलनकर्ते मानवी साखळी तयार करून महापालिकेला घेराव घालणार आहेत.

विशेष म्हणजे, याच दिवशी नाशिक महापालिकेची महासभा होणार असल्याने या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरातील खड्ड्यांचा प्रश्न अद्याप कायम असून, अनेक भागांत नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

आंदोलनाच्या आयोजकांनी राजकीय पक्ष, संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांना मतभेद बाजूला ठेवून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. खड्ड्यांमुळे चार नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने आता थेट महापालिकेला जाब विचारण्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे.

७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या आंदोलनानंतर तरी महापालिका प्रशासन खड्ड्यांच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेते का, याकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागले आहे.