नाशिकरोड परिसरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिजामाता नगर येथे दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या हातातील पर्स हिसकावून पलायन केल्याची घटना समोर आली आहे. २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास घडलेली ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या चोरीमध्ये सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, राखी जाधव या दूध घेऊन पायी घरी परतत होत्या. नाशिकरोडमधील आरंभ कॉलेजजवळील जिजामाता नगर परिसरात त्या घराच्या गेटजवळ पोहोचल्या असताना अॅक्टिव्हा दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील निळ्या रंगाची मिनी पर्स हिसकावून घेतली आणि घटनास्थळावरून पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.

चोरी झालेल्या पर्समध्ये ४५ हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल आणि पाच हजार रुपये रोख रक्कम होती. त्यामुळे एकूण ५० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्याच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 

या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार हिवाळे या प्रकरणाचा तपास करत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

 

दरम्यान, सणासुदीच्या काळात गर्दीच्या तसेच निवासी भागांमध्ये चोरीच्या घटनांबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज अधोरेखित होत आहे. भरवस्तीत घराच्या गेटजवळच महिलेची पर्स हिसकावून नेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणातील अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.