पंढरपूरहून त्र्यंबकेश्वरकडे परतणाऱ्या संत निवृत्तिनाथ महाराज पालखीचे नाशिक रोड परिसरातील देवळालीगाव येथे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. पंच कमिटीतर्फे पालखीचे पूजन आणि आरती करण्यात आली.

देवळालीगावातील दंड्या मारुती मंदिरात पालखी विसाव्यासाठी दाखल झाली होती. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. टाळ-मृदंगाचा गजर आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

यावेळी महिलांनी मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. वारकऱ्यांच्या उपस्थितीने देवळालीगावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

पंच कमिटीतर्फे विधीवत पूजा आणि आरती करून पालखीला निरोप देण्यात आला. त्यानंतर संत निवृत्तिनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वरकडे पुढील प्रवासासाठी रवाना झाली.

वारकरी परंपरा, भक्ती आणि श्रद्धेचा संगम असलेल्या या पालखी सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.