नाशिक : चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवासाठी शहरात गरबा प्रशिक्षण कार्यशाळांची जोरदार धूम सुरू आहे. दांडिया आणि गरबा महोत्सवात आत्मविश्वासाने थिरकता यावे, यासाठी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटांतील नागरिक प्रशिक्षणात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. शहरात विविध ठिकाणी एका तासाच्या विशेष सत्रांपासून ते महिना-दोन महिन्यांच्या प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणांचे शुल्क साधारणतः एक हजार ते तीन हजार रुपयांदरम्यान आहे.
यंदाच्या नवरात्रात 'ढोली तारो', 'नगाडा', 'चोगाडा तारा' यांसारख्या सदाबहार बॉलिवूड गीतांसोबतच 'कानुको', 'गल गोटो', 'राधे राधे गोविंद', 'थारी चनिया-चोली' आणि 'पोरी फिरीफिरी नाच' ही ट्रेंडिंग गाणी चांगलीच गाजत आहेत. प्रशिक्षक या गाण्यांवर आधारित खास स्टेप्स आणि फ्युजन कोरिओग्राफी शिकवण्यावर भर देत आहेत.
विशेष म्हणजे, कामाचा ताण हलका करण्यासाठी आणि शारीरिक फिटनेस जपण्यासाठी उच्चशिक्षित नोकरदार, डॉक्टर, इंजिनीअर्स, आर्किटेक्ट्स आणि आयटी क्षेत्रातील व्यावसायिकही व्यग्र दिनचर्येतून वेळ काढून या कार्यशाळांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. एकंदरीत, अवघ्या काही दिवसांवर आलेल्या उत्सवासाठी शहरवासीय गरब्याच्या तालावर थिरकण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत.