नाशिक : नवरात्रोत्सवाला सुरुवात झाल्याने घरोघरी घटस्थापना आणि देवीच्या पूजेची लगबग सुरू आहे. त्यातच दिवाळीचा सण जवळ येत असल्याने बाजारपेठांमध्ये खरेदीची तयारी सुरू झाली आहे. मात्र, यंदा पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती वाढल्याने भाविकांच्या खर्चात भर पडत आहे. दैनंदिन वस्तूंच्या महागाईपाठोपाठ आता सणासुदीच्या साहित्याचे दरही वाढल्याने नागरिकांसमोर खर्चाचे गणित सांभाळण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

पूजेसाठी आवश्यक तेल, कापूर, नारळ, हळद-कुंकू, देवीचे वस्त्र आणि हवनसामग्रीच्या किमती वाढल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती आणि तेलाच्या बाजारपेठेतील चढ-उतारांचा परिणाम काही वस्तूंच्या दरांवर होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

धूप आणि अगरबत्तीच्या किमतीत सुमारे पाच ते दहा टक्क्यांची, तर गायीच्या तुपाच्या दरात दहा ते पंधरा टक्क्यांची वाढ झाली आहे. नवरात्रोत्सवात पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या तांबे आणि पितळेच्या दिव्यांचे दरही दहा टक्क्यांनी वाढले आहेत. दगडी दिव्यांच्या किमतीत चाळीस टक्के, तर शंखाच्या किमतीत तीस टक्क्यांची वाढ झाली आहे.

नवरात्रोत्सवानंतर दिवाळीच्या खरेदीला वेग येणार आहे. अशा परिस्थितीत पूजासाहित्याच्या वाढलेल्या किमतींमुळे यंदा सण साजरे करताना नागरिकांना अधिक खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या बजेटवर महागाईचा परिणाम जाणवू लागला आहे.