'गण गण गणात बोते'च्या जयघोषात परळीत संत गजानन महाराजांच्या पालखीचे भक्तिमय आगमन
बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ नगरीत आज संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. 'गण गण गणात बोते' या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. शेकडो वारकरी आणि भाविकांनी पालखीचे उत्स्फूर्त स्वागत करत हरिनामाच्या गजरात भक्तीचा अनोखा सोहळा अनुभवला.
शेगाव ते पंढरपूर असा सुमारे ७५० किलोमीटरचा आणि ३३ दिवसांचा पायी प्रवास करणारी संत गजानन महाराजांची पालखी आज परळीत दाखल झाली. यंदा या पायी दिंडीचे ५७ वे वर्ष असून, सुमारे ७०० वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत.
पालखीचा बीड जिल्ह्यात चार दिवसांचा मुक्काम असणार आहे. या कालावधीत परळी, अंबाजोगाई आणि बोरी सावरगाव येथे कीर्तन, प्रवचन, धार्मिक कार्यक्रम तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
परळीतील संत जगमित्र नागा मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हरिनामाच्या अखंड गजराने आणि भक्तीमय वातावरणाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. पालखीच्या स्वागतासाठी स्थानिक नागरिक, वारकरी संप्रदायातील भाविक आणि विविध सामाजिक संस्थांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याने परळीतील धार्मिक वातावरण अधिकच मंगलमय झाले असून, पुढील चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे भाविकांना भक्तीचा आनंद अनुभवता येणार आहे.


