नाशिक : सामाजिक आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते गौतम भालेराव यांना महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या प्रतिष्ठित भीमरत्न पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. त्यांच्या सामाजिक तसेच आंबेडकरी चळवळीतील योगदानाची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष भदंत डॉ. एच. आर. धम्मदीप महाथेरो आणि सचिव आयुष्यमान राजेश वानखेडे यांचे नाशिकमधील वडाळा नाका परिसरात स्वागत करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात गौतम भालेराव यांच्या भीमरत्न पुरस्कारासाठी झालेल्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

येत्या १४ एप्रिल रोजी भारतातील पाच मान्यवरांना भीमरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार असून, त्यामध्ये नाशिकमधून गौतम भालेराव यांची निवड करण्यात आली आहे. सामाजिक क्षेत्रात तसेच आंबेडकरी चळवळीत त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठित सन्मान देण्यात येणार आहे.

पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर नाशिकमधील सामाजिक आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. गौतम भालेराव यांच्या निवडीमुळे नाशिकच्या सामाजिक चळवळीच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जात असल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष भदंत डॉ. एच. आर. धम्मदीप महाथेरो यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सामाजिक आणि आंबेडकरी चळवळीतील विविध मान्यवर, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

गौतम भालेराव यांना मिळणाऱ्या या सन्मानामुळे नाशिकच्या सामाजिक आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.