कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू असतानाच नदीपात्रात सांडपाणी सोडलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मुद्द्याकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मानव उत्थान मंचचे जगदीर सिंग यांनी अनोख्या पद्धतीने जनजागृती सुरू केली आहे.

जगदीर सिंग यांनी आपल्या दुचाकीच्या मागील बाजूस ‘मायबाप सरकार दया करा, गोदावरीत गटार सोडणे बंद करा’ असा फलक लावला आहे. या फलकाच्या माध्यमातून गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा नागरिक आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या स्वच्छतेला विशेष महत्त्व आहे. लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होणार असल्याने नदीपात्र स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. मात्र, नदीपात्रात सांडपाणी मिसळत असल्याचा आरोप होत असल्याने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

गोदावरीत सांडपाणी जाण्याच्या मुद्द्यावरून प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केल्याचं जगदीर सिंग यांनी सांगितलं. सांडपाणी प्रक्रिया केंद्र अर्थात एसटीपीच्या कामाबाबतही प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, दुचाकीवर लावलेल्या या फलकातून करण्यात आलेली जनजागृती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कुंभमेळ्याच्या आधी गोदावरी प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावलं उचलली जाणार का, याकडे आता लक्ष लागलं आहे.