मुंबई : अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या ४ हजार कोटी रुपयांच्या टेंडर प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत शिवसेनेचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी टेंडर प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संपूर्ण टेंडर प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी केली.

 

सुहास अण्णा कांदे यांनी आरोप केला की, गेल्या २० वर्षांपासून एकाच कंत्राटदाराला काम दिले जात असून त्यामुळे लाखो हमालांवर अन्याय होत आहे. टेंडर प्रक्रियेत 'टेंडर रिंग' झाल्याचा दावा करत त्यांनी या व्यवहारात सुमारे ५०० कोटी रुपयांचा कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला.

यावेळी त्यांनी समीर भुजबळ यांच्यावरही टीका करत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी सरकारकडे केली. या प्रकरणातील सर्व संबंधित बाबींची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि टेंडर प्रक्रिया तातडीने रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली.

 

https://www.aplanashik24.tv/education/amaravati-tribal-students-dbt-fund-protest-balwant-wankhade-ultimatum

 

दरम्यान, सुहास अण्णा कांदे यांनी केलेल्या या आरोपांमुळे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सरकार या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.