अमरावती : आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यात प्रलंबित असलेला DBT निधी तात्काळ जमा करण्यात यावा, या मागणीसाठी अमरावती येथे आंदोलन तीव्र झाले आहे. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) च्या वतीने आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू असून विद्यार्थ्यांनी निधी तातडीने वितरित करण्याची मागणी केली आहे.

आंदोलनाची माहिती मिळताच काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या समस्या आणि प्रलंबित निधीबाबतची माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांच्या खात्यात DBT निधी तातडीने जमा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

 

https://www.aplanashik24.tv/nashik-news/chor-chavadi-waterfall-deola-young-man-drowns-rishikesh-sansare

 

विद्यार्थ्यांनी अनेक दिवसांपासून शिष्यवृत्ती व अन्य शैक्षणिक खर्चासाठी मिळणारा DBT निधी प्रलंबित असल्याची तक्रार केली. निधीअभावी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार वानखडे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत येत्या सात दिवसांच्या आत विद्यार्थ्यांच्या खात्यात निधी जमा करण्याची मागणी केली. निर्धारित मुदतीत निधी वितरित न झाल्यास स्वतः आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी AISF कडून करण्यात आली आहे. प्रशासनाकडून पुढील काही दिवसांत कोणती भूमिका घेतली जाते, याकडे विद्यार्थ्यांसह शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.