नाशिकच्या लेकीने आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर समुद्रात ऐतिहासिक कामगिरी करत नाशिकसह महाराष्ट्राची मान उंचावली आहे. अवघ्या १६ व्या वर्षी दिव्या महाजन हिने जगातील सर्वाधिक खडतर जलतरण मार्गांपैकी एक मानला जाणारा नॉर्थ चॅनल पोहत पार केला आहे. नॉर्थ आयर्लंड ते स्कॉटलंडदरम्यानचे तब्बल ३५ किलोमीटरचे अंतर दिव्याने एकटीने पोहत पूर्ण करत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली.
थंडगार पाणी, प्रचंड लाटा आणि वेगवान समुद्री प्रवाह अशा अनेक आव्हानांचा सामना करत दिव्याने सोमवारी पहाटे नॉर्थ चॅनल पार केले. या आव्हानात्मक समुद्री प्रवासादरम्यान तिच्या शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक ताकदीचीही कसोटी लागली. मात्र, जिद्द, मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर दिव्याने हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले.
अवघ्या १६ व्या वर्षी नॉर्थ चॅनल पोहत पार करणारी दिव्या ही सर्वात कमी वयाची महिला जलतरणपटू ठरली आहे. तिच्या या कामगिरीमुळे ओपन वॉटर स्विमिंगच्या क्षेत्रात नाशिकच्या नावाची विशेष नोंद झाली आहे. कठीण परिस्थितीतही ध्येय सोडायचे नाही, हे दिव्याने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे.
नॉर्थ चॅनल हा जगातील अत्यंत आव्हानात्मक समुद्री जलतरण मार्गांपैकी एक मानला जातो. कमी तापमानाचे पाणी, समुद्रातील प्रवाह, लाटा आणि बदलते हवामान यामुळे या मार्गावर पोहणे जलतरणपटूंसाठी मोठे आव्हान असते. अशा परिस्थितीत ३५ किलोमीटरचे अंतर एकटीने पोहत पूर्ण करणे ही दिव्याच्या मेहनतीची आणि चिकाटीची मोठी पावती मानली जात आहे.
दिव्याच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या या यशामुळे अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा मिळणार असून, जलतरण क्षेत्रात पुढे जाणाऱ्या नव्या पिढीसाठी दिव्याची कामगिरी प्रेरणादायी ठरणार आहे.
अवघ्या १६ व्या वर्षी समुद्राच्या अथांग लाटांवर मात करत दिव्याने मिळवलेले हे यश नक्कीच नाशिकच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. तिच्या जिद्दीला आणि ऐतिहासिक कामगिरीला सलाम!


