नाशिक : खासगी शिकवणी केंद्रांवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारची नवी नियमावली अंतिम टप्प्यात आली आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या प्रस्तावित नियमांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
प्रस्तावित नियमांनुसार १३ वर्षांखालील विद्यार्थ्यांना खासगी शिकवणी केंद्रांमध्ये प्रवेश देता येणार नाही. तसेच २५ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या केंद्रांसाठी नोंदणी बंधनकारक करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास ५० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
शाळा आणि खासगी शिकवणी केंद्रांमध्ये संगनमत आढळल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द केली जाऊ शकते, असा इशाराही शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे. याशिवाय शाळेच्या आवारात खासगी शिकवणी वर्ग घेण्यास बंदी, फसव्या जाहिरातींवर कारवाई आणि शिकवणी सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्क परत करण्यासंदर्भातही नियम प्रस्तावित आहेत.
खासगी शिकवणी केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना दिवसाला जास्तीत जास्त पाच तास शिकवणी देता येईल, अशीही तरतूद प्रस्तावित आहे. त्यामुळे राज्यातील खासगी क्लासेसच्या कामकाजावर शिक्षण विभागाचा कडक अंकुश येण्याची शक्यता आहे.


