शिक्षण व्यवस्थेवर अभिजित दिपके आक्रमक; ९२ हजारांहून अधिक शाळा बंद पडल्याचा दावा

देशातील शिक्षण व्यवस्थेच्या मुद्द्यावरून सीझेपी संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर जोरदार टीका केली. गेल्या ८० वर्षांतील शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप करत, देशभरात ९२ हजारांहून अधिक शाळा बंद पडल्याचा दावा त्यांनी केला.

ग्रामीण आणि दुर्गम भागातील अनेक शाळांमध्ये आजही मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचं दिपके यांनी म्हटलं. प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थी शिक्षण घेत असून, विविध क्षेत्रांत यश मिळवत देशाचं नाव उज्ज्वल करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

शिक्षण व्यवस्थेकडे दुर्लक्ष का केलं जातंय, असा सवाल उपस्थित करत “मंत्री आणि मुख्यमंत्री आपल्या मुलांना कुठे शिकवतात?” असा थेट प्रश्न त्यांनी शिक्षणमंत्र्यांना केला. खासगीकरणाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली.

दरम्यान, आंदोलनादरम्यान प्रशासनाकडून संवेदनशीलता दाखवली जात नसल्याचा आरोपही करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या संविधानिक अधिकारांच्या रक्षणासाठी मुंबईत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा अभिजित दिपके यांनी दिला.