जालना : जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रामगव्हाण बुद्रुक गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या गैरहजेरीचा गंभीर मुद्दा ऐरणीवर आला आहे. या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग असून, दोन शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र, मंजूर दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक तब्बल चार वर्षांपासून गैरहजर असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे.
शिक्षकाच्या दीर्घकाळ गैरहजेरीमुळे शाळेतील पाचही वर्गांची जबाबदारी सध्या एकाच शिक्षकावर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत असल्याची चिंता पालकांनी व्यक्त केली आहे.
एकाच शिक्षकाला पाच वर्ग सांभाळावे लागत असल्याने अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देण्यात अडचणी निर्माण होत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आधीच गंभीर असताना शिक्षकांची अशी गैरहजेरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम करणारी ठरू शकते, अशी भावना पालकांमध्ये आहे.
चार वर्षांपासून शिक्षक गैरहजर असल्याचा आरोप नेमका कितपत खरा आहे? संबंधित शिक्षकावर प्रशासनाकडून काय कारवाई करण्यात आली? आणि विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त शिक्षकाची व्यवस्था कधी होणार? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
या प्रकरणाची संबंधित शिक्षण विभागाने गांभीर्याने दखल घेऊन शाळेतील शिक्षकांची उपस्थिती, मंजूर पदे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्थितीची चौकशी करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात शिक्षण विभागाची भूमिका काय आहे आणि प्रशासन यावर कोणती कारवाई करणार, याकडे आता पालकांसह ग्रामस्थांचं लक्ष लागलं आहे.


