नाशिक : नाशिककरांच्या रोजच्या चहाच्या खर्चात आता आणखी वाढ होणार आहे. दूध, साखर आणि इतर आवश्यक खाद्यपदार्थांच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने हॉटेल व्यावसायिकांनी चहाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या १ तारखेपासून १२ रुपयांना मिळणारा चहाचा कप आता १५ रुपयांना मिळणार आहे. म्हणजेच एका कपामागे ग्राहकांना तब्बल ३ रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. रोज चहा पिणाऱ्या नागरिकांच्या खिशावर या दरवाढीचा थेट परिणाम होणार आहे.
हॉटेल व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, दूध, साखर तसेच इतर आवश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे चहा तयार करण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढत्या खर्चाचा भार सांभाळणे कठीण होत असल्याने चहाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
नाशिकमध्ये अनेक नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा चहा हा महत्त्वाचा भाग आहे. सकाळच्या चहापासून ते कार्यालय, बाजारपेठ आणि मित्रमंडळींसोबतच्या गप्पांपर्यंत चहाला मोठी मागणी असते. त्यामुळे दरकपामागे तीन रुपयांची वाढ लहान वाटत असली तरी नियमित चहा घेणाऱ्या ग्राहकांच्या मासिक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
महागाईमुळे आधीच दूध, साखर आणि विविध खाद्यपदार्थांच्या किमती वाढत असताना आता चहाच्या दरवाढीनेही नाशिककरांच्या दैनंदिन खर्चात आणखी भर पडणार आहे. येत्या १ तारखेपासून लागू होणाऱ्या या नव्या दरांकडे आता ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
१२ रुपयांचा चहा आता १५ रुपयांना मिळणार असल्याने नाशिककरांच्या चहाला महागाईचा कडवटपणा येणार आहे.
आपलं नाशिक | आपला आवाज


