नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आंदोलन केले. यावेळी अधिकाऱ्यांच्या खुर्च्यांवर निषेधाचे बॅनर लावून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान मनसे पदाधिकाऱ्यांनी शहरातील खड्ड्यांमुळे अपघात होत असून नागरिकांचे जीव जात असल्याचा आरोप केला. तसेच या प्रकरणी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
मनसेने शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत प्रशासनाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पालकमंत्री बैठका घेत असताना प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था सुधारलेली नसल्याचा दावाही आंदोलनकर्त्यांनी केला. आंदोलनादरम्यान खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला.
दरम्यान, दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर ठोस कारवाई न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.


