नाशिक : मुसळधार पावसानंतर शहरातील अनेक भागांमध्ये गाळ, पाणवेली आणि कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांसमोर स्वच्छतेचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन नाशिक महानगरपालिकेने शहरभर विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.
महापालिकेकडून रामकुंड घाट, पंचवटी, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, सातपूर परिसर तसेच सोमेश्वर धबधबा परिसरात यंत्रसामग्री आणि जेसीबीच्या सहाय्याने गाळ, पाणवेली, लाकडे आणि इतर कचरा हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच पुलांवर अडकलेला वाहून आलेला कचराही हटविण्यात येत आहे.
याशिवाय अग्निशमन विभागाकडून पूरग्रस्त परिसर धुऊन स्वच्छ करण्याचे काम सुरू असून आवश्यक ठिकाणी निर्जंतुकीकरणही करण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन विभाग, स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी आणि इतर विभागांच्या संयुक्त सहभागातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, आतापर्यंत तब्बल 10 टन 865 किलो पाणवेली आणि इतर कचरा संकलित करण्यात आला असून तो खत प्रकल्पाकडे पाठविण्यात आला आहे. शहरातील सर्व पूरग्रस्त भागांची स्वच्छता पूर्ण होईपर्यंत ही विशेष मोहीम युद्धपातळीवर सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


