नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील दामोदर नगर येथे प्रोग्रेसिव्ह स्कूलजवळ उघड्या वीज वितरण पेट्यांमुळे विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात या उघड्या डीपी अधिक धोकादायक ठरत असल्याने स्थानिकांनी महावितरणकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

दामोदर चौकातील प्रोग्रेसिव्ह स्कूलसमोर काही वीज वितरण पेट्यांचे दरवाजे उघडे असून त्यावर कोणतेही संरक्षण कवच नसल्याचे दिसून येत आहे. शाळा सुटल्यानंतर या मार्गावरून मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची ये-जा होत असल्याने संभाव्य दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी सध्या तात्पुरत्या स्वरूपात लाकडी फळ्या लावून सुरक्षिततेची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, ही व्यवस्था कायमस्वरूपी नसल्याने संबंधित विभागाने तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे.

महावितरणने सर्व उघड्या वीज वितरण पेट्या सुरक्षित करून आवश्यक संरक्षण कवच बसवावे आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.