नाशिकच्या अशोका मार्ग परिसरातील जय हिंद कॉलनीमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन दिवसांत चार ते पाच नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सेक्रेट हार्ट शाळेजवळील जय हिंद कॉलनी परिसरात सध्या १० ते १२ भटके कुत्रे मुक्तपणे फिरत आहेत. त्यामुळे शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करतानाही भीती वाटत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणेकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

दरम्यान, लवकरात लवकर ठोस कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.