नाशिक शहरात पावसाचा जोर वाढताच रस्त्यांवरील डांबर वाहून गेल्याने अनेक ठिकाणी पुन्हा मोठे खड्डे पडले आहेत. पाथर्डी फाटा परिसरातील प्रभाग क्रमांक 31 मधील धोंगळे नगर, खंडेराव नगर आणि स्वप्नपूर्ती नगर येथील नागरिक आजही चांगल्या रस्त्यांच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे.
स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या बांधकाम विभागावर निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, खड्डे बुजवल्यानंतर काही दिवसांतच ते पुन्हा उघड होत असल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिका आयुक्त आणि महापौर यांनी संबंधित रस्त्यांची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नसल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.
रस्त्यांवरील खड्डे, चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना दैनंदिन प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत असून चारचाकी वाहनेही अनेक ठिकाणी अडकत असल्याचे नागरिकांनी सांगितले. साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढत असून परिसरातील मुलांना तापाच्या तक्रारी वाढल्याचीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. आगामी सिंहस्थसारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यापूर्वी शहरातील रस्ते सुरक्षित करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.


