नाशिक : सातपूर–अंबड लिंक रोडवर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांमुळे वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. एकेरी वाहतुकीमुळे दिवसभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून नागरिक, वाहनचालक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

रस्त्यावरील कामांदरम्यान पुरेसे नियोजन न झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला असून पादचाऱ्यांनाही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळी सातपूर आणि अंबड औद्योगिक परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. अनेक कर्मचाऱ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना वेळेवर गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची, वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची आणि रस्त्याची दुरुस्ती जलद गतीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, सततच्या पावसामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली असून योग्य नियोजन न झाल्यास भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.