नाशिकरोड येथील जुने बिटको हॉस्पिटल परिसरात एकाच रात्री पाच दुकाने फोडून १ लाख १२ हजार रुपयांची रोकड चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला नाशिक गुन्हे शाखेच्या नाशिकरोड युनिटने अटक केली आहे. अटकेनंतर आरोपीने आपल्या तीन साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
१४ जुलैच्या मध्यरात्री चोरट्यांनी भांडी दुकान, मेडिकल, एजन्सी आणि स्वीट शॉपसह एकूण पाच दुकाने लक्ष्य करत शटर व कुलूप तोडून दुकानांमध्ये प्रवेश केला. त्यानंतर रोकड घेऊन आरोपी पसार झाले होते. या घटनेमुळे नाशिकरोड परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर गुन्हे शाखेच्या नाशिकरोड युनिटने मानवी माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान मुख्य संशयित धन्ना रामलाल राठोड (वय ४०, रा. वैजापूर) हा रेल्वे स्थानक परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने आपल्या आणखी तीन साथीदारांसह पाच दुकानांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. या कारवाईमुळे चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली असून व्यापारी वर्गाने नाशिकरोड पोलिस आणि गुन्हे शाखेचे कौतुक केले आहे.


