नाशिक : रविवार कारंजा परिसरातील आर. के. बसस्थानकाच्या दुरवस्थेमुळे प्रवासी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बसच्या वेळापत्रकाचा फलक नसल्याने अनेकांना तासन्तास बसची प्रतीक्षा करावी लागत असून प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आर. के. बसस्थानक हे शहरातील महत्त्वाच्या बसथांब्यांपैकी एक मानले जाते. या ठिकाणाहून दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी, नोकरदार आणि नागरिक प्रवास करतात. मात्र, बसचे वेळापत्रक दर्शविणारा फलक नसल्याने कोणती बस कधी येणार याची माहिती प्रवाशांना मिळत नाही.

बसस्थानकावर बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसणे, स्वच्छतेचा अभाव आणि अपुऱ्या मूलभूत सुविधांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. विशेषतः पावसाळ्यात प्रवाशांना उभे राहण्यासाठीही सुरक्षित जागा उपलब्ध नसल्याची तक्रार नागरिकांनी केली.

या समस्येचा आढावा 'आपलं नाशिक'चे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी घेतला. यावेळी नागरिकांनी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन बसच्या वेळापत्रकाचा फलक बसवावा तसेच बसस्थानकावरील सुविधा सुधाराव्यात, अशी मागणी केली.