नाशिक शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यूचा धोका पुन्हा वाढताना दिसत आहे. जुलै महिन्यात शहरात 33 डेंग्यू रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे जानेवारीपासून जुलैअखेरपर्यंत नाशिक शहरातील डेंग्यू रुग्णांची संख्या 56 वर पोहोचली होती. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांतच आणखी 29 नवीन रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागासमोर चिंता वाढली आहे.

पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचत असल्याने डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या एडीस एजिप्ती डासांच्या पैदाशीला पोषक वातावरण निर्माण होतं. विशेष म्हणजे डासांची पैदास होण्यासाठी मोठं डबकं किंवा घाण पाणी आवश्यक नसतं. घराच्या आसपास किंवा घरात साचलेलं थोडंसं स्वच्छ पाणीही डासांच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत ठरू शकतं.

घरातील कुंड्या, कुंड्यांच्या खालील प्लेट्स, जुने टायर, प्लास्टिकच्या बाटल्या, भंगार साहित्य, पाण्याच्या टाक्या, कुलरच्या ट्रे तसेच फ्रिजच्या ट्रेमध्ये साचलेलं पाणी डासांच्या पैदाशीचं ठिकाण बनू शकतं.

डेंग्यूचा वाढता धोका लक्षात घेता महापालिका आणि आरोग्य विभागाकडून डासांची उत्पत्तीस्थळं शोधण्यासाठी तपासणी मोहीम राबवली जात आहे. विविध ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळल्यास संबंधित आस्थापनांना नोटिसाही दिल्या जात आहेत.

डेंग्यूचा प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनीही आपल्या घराच्या आणि परिसराच्या आसपास पाणी साचणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. आठवड्यातून किमान एकदा घराभोवती पाहणी करून कुंड्या, कुलर, पाण्याच्या टाक्या, फ्रिज ट्रे आणि इतर ठिकाणी साचलेलं पाणी काढून टाकावं.

डेंग्यूचा डास आपल्या घरापासून दूरच तयार होतो असं नाही; तो घराच्या अगदी आसपासही वाढू शकतो. त्यामुळे पाणी साचू देऊ नका आणि डासांची पैदास रोखा.