नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्मध्वजाचे दर्शन नागरिकांना घेता यावे आणि या मंगल सोहळ्यात सर्वांना सहभागी होता यावे, या उद्देशाने ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शुक्रवारी (दि. ३०) दुपारी ३ वाजता मोदी ग्राउंड येथून भव्य ग्रामपरिक्रमेचा शुभारंभ होणार आहे. या मिरवणुकीत २१ फूट उंच अमृतकुंभासह विविध सामाजिक व धार्मिक संस्थांचे आकर्षक चित्ररथ प्रमुख आकर्षण ठरणार आहेत.
तीर्थपुरोहितांचे मंत्रोच्चार, शंखनाद आणि 'नृत्यानंद कथक' संस्थेच्या विद्यार्थिनींच्या श्री गणेश वंदनेने या परिक्रमेचा प्रारंभ होईल. या सोहळ्याला नाणीजधाम येथील जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता महंत संजय दास, महंत ज्ञानदास महाराज यांच्यासह विविध आखाड्यांचे प्रमुख श्रीमहंत, महामंडलेश्वर, साधुसंत, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
परिक्रमेचे मुख्य आकर्षण व मार्ग:
मिरवणुकीत शौर्य पथकांची साहसी प्रात्यक्षिके, ढोल-ताशा पथके, आदिवासी बांधवांचे पारंपरिक नृत्य आणि डोक्यावर कुंभकलश व तुळशी वृंदावन घेतलेल्या महिलांचा सहभाग असेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, इस्कॉन, स्वामी समर्थ केंद्र यांसह अनेक संस्था यात सहभागी होणार आहेत.
परिक्रमा मार्ग: मोदी ग्राउंड - तपोवन - पंचमुखी हनुमान - गणेशवाडी - गाडगे महाराज पूल - नेहरू चौक - वीर सावरकर पथ - धुमाळ पॉईंट - मेनरोड - रविवार कारंजा - अहिल्याबाई होळकर पूल - मालेगाव स्टँड मार्गे रामकुंड येथे परिक्रमेचा निरोप होईल.


