नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्यासाठी तब्बल ३५ हजार कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केल्यानंतर नाशिक महापालिकेच्या माध्यमातून कुंभमेळ्याच्या नियोजनाला वेग देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने कुंभमेळ्याच्या नियोजनाचे प्रेझेंटेशन नगरसेवकांसमोर ठेवण्यात आले. मात्र, या महत्त्वाच्या बैठकीतच प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव समोर आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

महापालिकेच्या १२२ नगरसेवकांना या प्रेझेंटेशनसाठी बोलावण्यात आले होते. बैठकीच्या सुरुवातीला मोठ्या संख्येने नगरसेवक उपस्थित झाले होते. मात्र, संबंधित अधिकारी वेळेत बैठकीच्या ठिकाणी न पोहोचल्याने नगरसेवकांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. अखेर प्रतीक्षा करून एक-एक करत अनेक नगरसेवकांनी बैठक सोडली.

काही वेळानंतर अधिकारी बैठकीच्या ठिकाणी पोहोचले. मात्र, तोपर्यंत बहुतांश नगरसेवक निघून गेले होते. अधिकाऱ्यांनी अन्य बैठक असल्याचे कारण देत उपस्थित नगरसेवकांसोबतची बैठक आटोपती घेतली. त्यानंतर काही नगरसेवकांनी फोन करून निघून गेलेल्या नगरसेवकांना पुन्हा बैठकीसाठी बोलावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही अवघे ३० ते ३५ नगरसेवकच पुन्हा उपस्थित झाले.

महापालिकेत एकूण १२२ नगरसेवक असताना कुंभमेळ्यासारख्या महत्त्वाच्या विषयावरील प्रेझेंटेशनला मोठ्या संख्येने नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एकीकडे कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांचा मोठा निधी जाहीर करण्यात आला आहे, तर दुसरीकडे या निधीतून होणाऱ्या कामांचे नियोजन लोकप्रतिनिधींसमोर मांडण्यासाठी आयोजित बैठकीतच अधिकारी वेळेत उपस्थित राहू शकले नाहीत.

बैठकीतील या विस्कळीतपणामुळे नगरसेवकांमध्ये नाराजी निर्माण झाली. यावेळी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले. अधिकारी वेळेत येणार नसतील, तर प्रेझेंटेशनचा हा खटाटोप कशासाठी केला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कुंभमेळ्यासारख्या महत्त्वाच्या विषयावरील बैठकीसाठी लोकप्रतिनिधींना प्रतीक्षा करावी लागणे योग्य नसल्याचेही त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

यापुढे अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, अशी स्पष्ट सूचना केदार यांनी प्रशासनाला केली. “यापुढे असे प्रकार घडता कामा नयेत,” असे बजावत त्यांनी प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली.

कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींचा निधी, मोठ्या प्रमाणावर होणारी कामे आणि त्यासाठीचे नियोजन या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या बैठकीत झालेला हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे. कुंभमेळ्याची तयारी मोठ्या प्रमाणावर सुरू असताना प्रशासनाच्या बैठकीच्या नियोजनातच गोंधळ झाल्याने पुढील नियोजनाच्या कार्यक्षमतेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.