नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शंखनाद सोहळ्याला अवघे अठरा दिवस शिल्लक असताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अद्याप अधिकृत निमंत्रण पाठविण्यात आलेले नाही. खुद्द कुंभमेळा प्राधिकरणानेच याबाबत कबुली दिल्याने ध्वजारोहण सोहळ्याच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे मान्यवरांना निमंत्रित करण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे प्रमुख तीर्थक्षेत्रांतील विकासकामे आणि रस्त्यांच्या स्थितीमुळे प्रशासनासमोरील आव्हाने वाढली आहेत.
येत्या ३१ ऑक्टोबरला ध्वजारोहण आणि शंखनादाने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रारंभाची औपचारिक घोषणा होणार आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री, केंद्र व राज्य सरकारमधील मंत्री तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रित करण्याची तयारी कुंभमेळा प्राधिकरणाकडून केली जात आहे. मात्र, राष्ट्रपती भवनाशी चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत असले, तरी राष्ट्रपतींच्या उपस्थितीबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही.
कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी राष्ट्रपतींच्या उपस्थितीबाबत सविस्तर माहिती नंतर देण्यात येईल, असे स्पष्ट केले. राष्ट्रपती नाशिकमधील रामतीर्थ येथे उपस्थित राहणार की त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थ येथे, याबाबतही अद्याप स्पष्टता नाही. त्यांच्या आगमनाचा मार्ग आणि वाहतुकीचे नियोजनही निश्चित झालेले नाही.
दरम्यान, रामकुंड आणि कुशावर्त तीर्थ परिसरात विकासकामांसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. ध्वजारोहणापूर्वी ही कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले असले, तरी कामांचा वेग पाहता मुदतीत पूर्ततेबाबत साशंकता आहे. त्यामुळे राष्ट्रपतींचे निमंत्रण, उपस्थिती आणि रस्त्यांची कामे या तिन्ही आघाड्यांवर प्रशासनाची कसोटी लागणार आहे.


