त्र्यंबकेश्वर : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त तीर्थ येथे उभारण्यात आलेल्या भव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण 31 फूट उंच सिंहस्थ ध्वजस्तंभाचे भव्य उद्घाटन गुरुवारी (दि. १७) कुंभमेळामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाच्या वतीने या ऐतिहासिक ध्वजस्तंभाची उभारणी करण्यात आली असून उद्घाटनाचा विशेष सोहळा आयोजित केला आहे.
या ध्वजस्तंभाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यावर अत्यंत सुरेखपणे साकारण्यात आलेली समुद्रमंथनाची पौराणिक संकल्पना! भारतीय पुराणपरंपरेतील देव-दानवांचे प्रयत्न, अमृतप्राप्ती आणि अमृतकलशाचे महत्त्व अधोरेखित करणारा प्रसंग या स्तंभावर कोरण्यात आला आहे. समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या १४ रत्नांचे मनमोहक चित्रण यावर करण्यात आले असून, कुंभपर्वाच्या धार्मिक महात्म्याशी ही संकल्पना तंतोतंत सुसंगत आहे.
ध्वजस्तंभाच्या सर्वात वरच्या शीर्षस्थानी अमृतकलश घेऊन जाणारा गरुड साकारण्यात आला आहे. अमृतकलश आणि गरुडाची ही प्रतिमा कुंभमेळ्याच्या अमृतपरंपरेचे प्रतीक म्हणून भाविकांचे लक्ष वेधून घेईल. तसेच, ध्वजस्तंभाच्या तळाशी पूर्व आणि पश्चिम दिशांना मंगलकार्याचे आराध्य दैवत श्री गणेशाच्या मूर्ती विराजमान करण्यात आल्या आहेत.
समुद्रमंथनातील चौदा रत्ने, शीर्षस्थानी असलेला अमृतकलशधारी गरुड आणि श्री गणेशप्रतिमा यांच्या अद्वितीय मिलाफामुळे या ध्वजस्तंभाला अभूतपूर्व धार्मिक व सांस्कृतिक अधिष्ठान लाभले असून, कुशावर्त तीर्थाच्या वैभवात यामुळे मोठी भर पडली आहे.


