नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील भूकंपप्रवण कहांडोळपाडा गावात जमिनीला मोठ्या भेगा पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतजमिनींसह मुख्य रस्त्यालगतच्या भागातही भेगा पडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, मुसळधार पावसानंतर अनेक ठिकाणी जमीन खचल्यासारखी स्थिती निर्माण झाली असून मुख्य रस्त्यालाही तडे गेले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेदरम्यान परिसरात दोन वेळा भूकंपाचे धक्केही जाणवले. त्यामुळे जमिनीला पडलेल्या भेगांचे नेमके कारण काय, याबाबत प्रशासनाने तज्ज्ञांकडून तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
ग्रामस्थांनी महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून परिस्थितीचे मूल्यांकन करावे तसेच आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


