नाशिकमधील सोमेश्वर धबधब्यावर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी अनेक पर्यटकांनी नदीपात्रात उतरून धोकादायक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.
प्रशासनाकडून वारंवार सुरक्षिततेच्या सूचना आणि आवाहन करण्यात येत असतानाही काही पर्यटकांकडून नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे संभाव्य दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी घटनास्थळी नियुक्त कर्मचारी किंवा सुरक्षारक्षक नसल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पर्यटकांनी स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, तसेच संबंधित यंत्रणांनी आवश्यक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


