नाशिक जिल्ह्यात भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरूच असून, सलग दुसऱ्या दिवशी तीन सौम्य भूकंपाचे धक्के नोंदवण्यात आले आहेत. सोमवारी सकाळी ७.५३ वाजता २.९ रिश्टर स्केल, सकाळी ९.५० वाजता २.७ रिश्टर स्केल आणि दुपारी २.३८ वाजता २.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार, या भूकंपांची खोली ५ ते ७ किलोमीटर दरम्यान आहे. सुरगाणा आणि दिंडोरी परिसर या भूकंपांचे मुख्य केंद्र ठरत आहेत.

२१ जुलैपासून नाशिक जिल्ह्यात सातत्याने सौम्य भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात चिंता निर्माण झाली आहे.

दरम्यान, भूकंपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.