घोटी-त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 च्या रुंदीकरणावरून शेतकरी आणि प्रशासन आमनेसामने आले आहेत. महामार्गाच्या रुंदीकरणासाठी 12 मीटर जागा घेण्याच्या भूमिकेला बाधित शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे.

प्रत्यक्षात सध्याच्या रस्त्याची वहिवाट सात मीटरचीच असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे गरजेपेक्षा अधिक शेतजमीन भूसंपादित करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आमदार हिरामण खोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी प्रत्यक्ष रस्त्याची मोजणी करून त्यानुसारच भूसंपादन करावे, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.

तसेच भूसंपादनामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

महामार्गाच्या विकासकामाला शेतकऱ्यांचा विरोध नसून, रस्त्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त शेतजमीन संपादित करू नये, अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून प्रत्यक्ष मोजणी आणि भूसंपादनाबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे बाधित शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.