नाशिक जिल्ह्यात मागील महिनाभरात भूकंपाचे ४५ धक्के जाणवले आहेत. प्रशासनाच्या माहितीनुसार, यातील बहुतांश धक्के ४ रिश्टर स्केलपेक्षा कमी तीव्रतेचे आहेत. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कता वाढवली असून विविध ठिकाणी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
शाळा, कारखाने आणि इमारतींची तपासणी केली जात आहे. विशेषतः धोकादायक इमारतींची पाहणी सुरू असून, सहा ठिकाणी भिंतींचे पंचनामे करण्यात आले आहेत.
भूकंपाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर प्रशासनालाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात भूस्खलनाच्या दोन घटना घडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मात्र, सध्या जिल्ह्यात कोणताही मोठा धोका नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


