मुंबई : अंधेरी पश्चिम परिसरात बेस्ट बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. बसचे ब्रेक फेल झाल्याने अनियंत्रित झालेल्या बेस्ट बसने रस्त्यावरील तब्बल १४ वाहनांना जोरदार धडक दिली.
या अपघातात १२ ते १३ रिक्षांचे मोठे नुकसान झाले असून अनेक वाहनांचा चक्काचूर झाला आहे. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. या अपघातात दोन ते तीन जण जखमी झाले असून त्यांना तातडीने कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, बस चालकाने बसचे ब्रेक अचानक निकामी झाल्याचा दावा केला आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले.
दरम्यान, या घटनेमुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.


