नाशिक:नाशिकच्या आडगाव परिसरातील बळी मंदिरासमोर रविवारी दुपारी भीषण अपघात झाला. रॉंग साईडने आलेल्या पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने २७ वर्षीय दिपक गवजीराम चोरमले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ दिपक यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. विशेष म्हणजे, दिपक यांचे अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून जेऊर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या पिकअप चालकाविरोधात आडगाव पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. बळी मंदिर परिसरात रॉंग साईडने वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.