नाशिकच्या अशोकनगर परिसरात हिट अँड रनची धक्कादायक घटना घडली असून, भरधाव अज्ञात कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चौघांना जोरदार धडक दिली. हा अपघात जाणता राजा मैदानाजवळ घडला.

या अपघातात एकाच कुटुंबातील सदस्यांसह तीन ते चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून, अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेदरम्यान एका पित्याने प्रसंगावधान दाखवत सहा महिन्यांच्या बाळाला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, धडकेच्या तीव्रतेमुळे बाळाच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातानंतर संबंधित वाहनचालक कारसह घटनास्थळावरून फरार झाला. माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहन आणि चालकाचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणातील फरार चालकाला तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.