नाशिक शहरातील खड्ड्यांच्या समस्येवरून नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या पाच नागरिकांच्या मृत्यूनंतर विविध भागांतील नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत ठोस कारवाईची मागणी केली आहे.

नागरिकांनी मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अपघातांसाठी जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई व्हावी आणि शहरातील धोकादायक रस्त्यांची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत.

यासाठी प्रशासनाला १४ ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. या कालावधीत मागण्यांची पूर्तता न झाल्यास व्यापक लोकआंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

पावसाळ्यात शहरातील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढल्याची तक्रार सातत्याने होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे.